मालवण आणि पालघरमध्ये आढळला खनिज तेलाचा खजाना! आठ वर्षांचे संशोधन फळाला, देशाचे तेल उत्पादन चारपटीने वाढणार

वाळवंटातील सोने अशी ओळख असलेल्या खनिज तेलाचे मोठे साठे मालवण, पालघरच्या सागरी कक्षेत आढळून आले आहेत. तब्बल आठ वर्षांच्या संशोधनानंतर हे यश मिळाले असून यामुळे हिंदुस्थानातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता आहे.

खनिज तेलाच्या प्रचंड साठ्यांमुळे अरब राष्ट्रांचे अर्थकारणच नव्हे तर राजकारणही ढवळून निघाले. अमेरिकेतील तेलाच्या साठ्यांमुळे अरब राष्ट्रांचे राजकारण बदलून टाकले. अशा या खनिज तेलाची सोन्याची चावी हिंदुस्थानच्या हाती लागली आहे. त्यामुळे कोकण भूमीबरोबरच हिंदुस्थानचेही अर्थकारण बदलून जाणार आहे.

रोजगार, उद्योगांना मिळणार चालना

तेलाचे प्रत्यक्ष उत्खनन सुरू झाल्याने कोकणातील स्थानिक उद्योगांना चालना मिळेल. तसेच येथे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे कोकणातील अर्थकारणही बदलून जाणार आहे.

पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 5 हजार 338 आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13 हजार 131 चौरस कि.मी. क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत.