विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज विधीमंडळात पार पडला. मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग करत शपथविधीवर बहिष्कार घातला. ‘मॉक पोल’ची घोषणा करणाऱ्या मारकडवाडीत ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज शपथ घेणार नाही, असे शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजच्या दिवसासाठी निषेध म्हणून शपथ घेतली नाही. बहुमताचे सरकार आल्यानंतर राज्यात जे वातावरण हवे, उत्साह हवा, जल्लोष हवा तसे कुठेही दिसत नाही. कुणीही हा विजय साजरा करत नाहीय. हे बहुमत जनतेने दिलेले आहे की निवडणूक आयोग, ईव्हीएमने दिलेले आहे? हा प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
पाशवी बहुमत हा जनाधार नाही! महाविकास आघाडीचा सभात्याग, शपथविधीवर बहिष्कार; एकही आमदार आज शपथ घेणार नाही pic.twitter.com/lqBaqe7aCe
— Saamana Online (@SaamanaOnline) December 7, 2024
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वांनीच मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या माध्यमाने निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले. हे जनतेच्या मनातील प्रश्न आहे. मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ‘मॉक पोल’ची तयारी केली होती. हे सर्व निवडणूकनंतर होत होते. तिथून जिंकलेल्या उमेदवारानेही ‘मॉक पोल’ला पाठिंबा दिला होता. ‘मॉक पोल’ जनतेच्या मनातील शंकांना उत्तर देणारा होता, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
बॅलेट पेपरवर कोण जिंकू शकते, ईव्हीएमवर कोण, कसे जिंकू शकते हे आम्ही अनेकदा दाखवले आहे. आम्ही पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमच्या मतांमधील तफावतही दाखवली. पण मारकडवाडीमध्ये फक्त कर्फ्युच नाही तर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करून काही जणांना अटकही करण्यात आली. याचा निषेध म्हणून आम्ही शपथ घेतली नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पाशवी बहुमत हा जनाधार नाही! महाविकास आघाडीचा सभात्याग, शपथविधीवर बहिष्कार
ते पुढे म्हणाले की, आम्ही हरलेलो उमेदवार नाहीत. आम्ही जिंकून आलेलो आहोत. तरी देखील आमच्या मनात ईव्हीएमबद्दल, निवडणूक आयोगाबद्दल शंका आहे. जनतेचा मान राखून त्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्याचा मान राखून शपथ घेत नाही आहोत.
लोकशाहीचा लॉन्ग मार्च’ आम्ही हाती घेत आहोत. 2014 पासून लोकशाही चिरडण्याचे काम सुरू आहे. लोकसभेत जनतेने निकाल दिला, पण तोच निकाल चिरडण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्याविरोधात आम्ही हे पाऊल उचलले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
EVM विरोधात वणवा पेटला! शरद पवार, राहुल गांधी मारकडवाडीला जाणार; आव्हाड म्हणाले, ‘ही ठिणगी…’