
राज्यातील सात जिह्यांतील पाणी पिण्यास अयोग्य असून पाण्यात नायट्रेटचे प्रमाण प्रचंड असल्याचे वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 मधून उघड झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सात जिह्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केसगळतीसह अनेक व्याधींमुळे डोक्याला ताप झाला आहे.
विधानपरिषदेत शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे यांच्यासह काँग्रेसचे डॉ. प्रज्ञा सातव आणि अभिजीत वंजारी यांनी पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात केंद्र सरकारच्या भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 नुसार 650 पाण्याचे नमुने नायट्रेट बाधित आढळून आले.
विदर्भातील वर्धा, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि मराठवाड्यातील नांदेड, बीड तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगावात तपासणी केलेल्या 431 नमुन्यांपैकी 219 नमुने नायट्रेट बाधित आढळून आले. खते, कीटकनाशके आणि कारखान्यांमधून प्रक्रिया न करता सोडले जाणारे पाणी यामुळे भूजल प्रदूषित झाले. अशा प्रदूषित पाण्यामुळे केसगळती, पोटदुखीचा त्रास, थायरॉईड आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे मुंबईतील फिजीशियन डॉ. दीपक बैद यांनी सांगितले.
45 मिली ग्रॅम प्रतिलिटरहून अधिक नायट्रेट घातक
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या बीआयएस निकषांनुसार 45 मिली ग्रॅम प्रतिलिटरपर्यंत नायट्रेटचे प्रमाण पाण्यात असेल तर ते पाणी पिण्यास योग्य आहे. परंतु, त्याहून अधिक नायट्रेट असेल तर ते पाणी आरोग्यासाठी घातक आहे. नायट्रेटचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेने सात जिह्यांतील पाण्याचे तब्बल 29,414 नमुने तपासले. त्यातील 3 हजार 498 नमुन्यांमध्ये केंद्र सरकारच्या बीआयएस निकषांनुसार 45 मिली ग्रॅम प्रतिलिटरहून अधिक नायट्रेटते प्रमाण आढळले.
नांदेडमध्ये सर्वात भयंकर स्थिती असून तेथील 3 हजार 877 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 90 पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीहून अधिक असल्याचे आढळले.