महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेविरोधात डॉक्टर हायकोर्टात

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी होणार आहे. परंतु तब्बल साडेआठ हजार डॉक्टर डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस आणि पाच हजार डॉक्टर हे पालिकेच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांत शिकवणारे आहेत. त्यामुळे त्यांना कामासाठी रजा घ्यावी लागेल. परिणामी रुग्णालयांतील काम ठप्प होऊन त्यांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन डॉक्टर संघटनांनी निवडणूक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी ठेवण्याची आणि 70 हजार डॉक्टरांना मतदार यादीत सामावून घेण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स मुंबई आणि हिलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनलसह विविध संघटनांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला वारंवार निवेदन देऊन निवडणुकीची तारीख बदलण्याची विनंती केली, परंतु त्यांची ही विनंती मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे हिलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनलचे समन्वयक डॉ. तुषार जगताप यांनी सांगितले.