महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातकडे; महायुती सरकारच्या नाकावर टिच्चून पळवापळवी सुरुच

महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला आहे. देशातील सर्वात मोठ्या रिन्यूएबल अ‍ॅण्ड ग्रीन एनर्जी कंपनीचा (रिन्यू) 18 हजार कोटींचा प्रकल्प नागपूरच्या अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक परिसरात स्थापन होणार होता. मात्र आता हा प्रकल्प गुजरातकडे गेला असून यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

महाराष्ट्र रसातळाला; उद्योग – व्यवसाय पळविणाऱ्या गुजरातने मागे टाकले

महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे महाराष्ट्रात येणारा आणखी एक उद्योग गुजरातकडे गेला असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे, असेही वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.

हे वाचा – आमचे हक्काचे उद्योग गुजरातला पळवले, मी नडणारच! आदित्य ठाकरे यांचा इशारा

हिंदू – मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा… सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.