महिलांच्या अपुऱ्या स्वच्छतागृहांच्या संख्येवरून लोकायुक्तांनी राज्य सरकारला दणका दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांना असंख्य आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबई शहरात कामानिमित्त बाहेर पडणाऱया महिलावर्गासाठी स्वच्छतागृहांची पुरेशी उपलब्धता करण्याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱयांची एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले आहेत. त्यानंतर आता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चपदस्थ अधिकाऱयांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई, स्त्री-पुरुष महिला समानतेच्या युगात आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे आहेत. मात्र महिलांना बाहेर काम करणे सोयीचे व्हावे यात अनेक आव्हाने आहेत. महिलांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. यामुळे महिलांना अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. ओव्हल मैदान, राज्यातील इतर मैदानांत येणाऱया महिला खेळाडू तसेच लोकायुक्तांनी ओव्हल मैदान, राज्यातील इतर मैदाने तसेच मुंबईत कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याची दखल लोकायुक्तांनी घेतली आहे. त्यानुसार आता या प्रकरणी सूचना करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देशही दिले होते. आता त्या निर्देशानुसार ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) या समितीचे अध्यक्ष असतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, महिला व बालविकास, शालेय शिक्षण व क्रीडा या विभागांचे प्रधान सचिव या समितीवर असतील. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले अतिरिक्त महापालिका आयुक्त दर्जाचे अधिकारीदेखील या समितीवर असतील. ही समिती स्वच्छतागृहांच्या बाबत सूचना करेल व मार्गदर्शन करेल. पुढील सहा महिन्यांत या एसआयटीचा अहवाल सरकारला सादर करेल.