
राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या असून रविवारी भाजपने त्यांच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी या तिघांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचा पुन्हा एकदा पत्ता कट झाला आहे.
भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली होती. या यादीत माधव भंडारी अमरनाथ राजूरकर यांच्या सोबत दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांची देखील नावे होती. मात्र दिल्लीवरून शिक्कामोर्तब होऊन आलेल्या नावांमध्ये माधव भंडारी अमरनाथ राजूरकर यांचे नाव नसून दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे विधान परिषद सदस्य असणारे प्रवीण दटके, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर तर शिंदे गटाचे आमश्या पडवी आणि अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे पाच सदस्य विधानसभेत निवडून आले आहेत. यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन तर शिंदे गट व अजित पवार गटाच्या वाटेला प्रत्येकी एक जागा आली आहे.
अजित पवार गटात अनेक इच्छुक
अजित पवार गटाच्या वाटय़ाला एक जागा आलेली आहे, मात्र या एका जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. माजी खासदार आनंद परांजपे, सुबोध महिते, सुनील टिंगरे, दीपक मानकर, नाना काटे आदी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे.
शिंदे गटाकडून कोण?
शिंदे गटातून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांचे जोरदार लॉबिंग सुरू आहे. एकच जागा असल्याने कुणाला संधी द्यायची हा प्रश्न आहे. कॉँग्रेसची साथ सोडून सोमवारीच शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठी आहे.