विधान परिषदेच्या अकरा रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 14 अर्ज दाखल झाले. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवशी प्रत्यक्षात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत प्रभाकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, शिंदे गटाच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार गट) राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आजच्या घडीला ११ जागांसाठी १४ अर्ज आल्याने विधान परिषद निवडणुकीची शक्यता वाढली आहे. अजय सेंगर व अरुण जगताप या दोन अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. पण त्यांच्या उमेदवारी अर्जावर दहा आमदारांच्या सह्या नाहीत.
विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. रिक्त होऊ घातलेल्या या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षीय बलाबल
विधानसभेत काँग्रेसचे ३७, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख शिवसेनेसोबत त्यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते. महाविकास आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज भासेल. आणखी तीन मतांसाठी महाविकास आघाडीची मदार समाजवादी, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष तसेच अपक्ष आमदारांवर असेल. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटून काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस आपल्या उमेदवारीसाठी २३ पेक्षा जास्त मतांचा कोटा निश्चित करण्याची शक्यता आहे.
विजयासाठी 23 मतांचा कोटा
लोकसभा निवडणुकीतील विजय, आमदारांचे राजीनामे आणि सदस्यांचे निधन यामुळे विधानसभेचे संख्याबळ सध्या 274 इतके आहे. परिणामी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा कमी झाला असून तो 23(22.84) वर आला आहे.
शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज दाखल
शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नसीम खान उपस्थित होते.