
बेलापूर मतदारसंघाची मी विद्यमान आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या उमेदवारीवर माझाच अधिकार आहे. सध्या काही जण बेलापूरमधून आमदार होण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र त्या स्वप्न बघणाऱ्यांना मी सांगू इच्छिते, तुमच्या बापाला मी हरवून बसले आहे. माझ्या नादाला लागू नका. जो माझ्या नादाला लागतो, त्याचा नाद मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, असा कडकडीत दम भाजपच्या बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना दिला आहे.
नेरुळ येथील सेक्टर १० मध्ये भाजपच्या वतीने सीसीटीव्ही उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपचे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक आणि भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. या वेळी त्या म्हणाल्या की, या मतदारसंघाचे गेल्या दहा वर्षांपासून मी नेतृत्व करीत आहे. आता काही जणांना बेलापूरचे आमदार होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांच्याकडून संपर्क कार्यालय सुरू केले आहे. दहा वर्षे मात्र ते गाढ झोपेत होते. बेलापूरमध्ये आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, तुमच्या बापाला मी हरवून बसले आहे. त्यामुळे माझ्या वाट्याला जाऊ नका, जो माझ्या नादाला लागतो, त्याचा नाद मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, असेही त्यांनी संदीप नाईक यांना सुनावले.
कमिशन खाणाऱ्यांचे नाव सुचवणार नाही
बेलापूरमध्ये मी काय कायम आमदार राहणार नाही. मी जरी उमेदवारी घेतली नाही, तरी कमिशन खाणाऱ्यांचे नाव मी उमेदवारीसाठी सुचवणार नाही. बांधकाम व्यावसायिकांना, कंत्राटदारांना त्रास देणाऱ्या नेत्यांना नागरिक स्वीकारणार नाहीत. बेलापूरचा उमेदवार चारित्र्यवान हवा, असेही शालजोडे मंदा म्हात्रे यांनी नाईक कुटुंबाला या वेळी लगावले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक आणि त्यांचे पूत्र संदीप नाईक यांच्यावर जोरदार टीका केल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.