भाईंदरमध्ये लाडक्या बहिणींची ई-सेवा केंद्रावर लूट; कागदपत्रांसाठी मागितले जातात अधिकचे पैसे

सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता संपूर्ण राज्यात महिलांची धावाधाव सुरू आहे. मात्र भाईंदरमध्ये या कागदपत्रांसाठी ई-सेवा केंद्रांवर अधिकचे पैसे मागून लुटपाट सुरू आहे. याबाबत तहसील कार्यालयात तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला असून योजना राबवायची असेल तर सरळ राबवा अन्यथा घोषणा करू नका, असा संताप व्यक्त होत आहे. यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने अधिकचे पैसे उकळणाऱ्या ई-सेवा केंद्रांवर कारवाईचा दणका देण्यासाठी पथकाची नेमणूक केली आहे.

लोकसभा निवडणुकीत बसलेला दणका आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारने अर्थसंकल्पात आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली असून त्यातून प्रत्येक महिलेला दरमहिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे गावागावात या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांकरिता महिलांची धावाधाव सुरू आहे. मात्र मीरा, भाईंदरमध्ये या योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेले दाखले मिळवण्याकरिता खासगी महा ई-सेवा केंद्रांकडून महिलांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.

शहरातील जवळपास 40 केंद्रांवर ही लुटालूट सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे पैसे मोजूनदेखील कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने अनेक महिलांनी अप्पर तहसील कार्यालयात तक्रारी करत संताप व्यक्त केला. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने शहरातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’, महा ई-सेवा केंद्रांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली असून दोषींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अप्पर तहसीलदार केंद्र (मेनू) महा नीलेश गौंड यांनी दिली.

निवडणुकीत बंद केलेले केंद्र उघडलेच नाही

भाईंदर पश्चिमेतील अतिरिक्त तहसील कार्यालयातील महा ई-सेवा केंद्रात अवघे 34 रुपये 50 पैसे शुल्क आकारून अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला दिला जात होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे केंद्र बंद करण्यात आले होते. ते आजतागायत न उघडल्याने महिलांना दाखले मिळवण्यासाठी शहरातील अन्य खासगी महा ई-सेवा केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. सरकारी अनास्थेमुळेच खासगी केंद्रचालकांकडून ही लुटमार सुरू असल्याचा संताप महिलांनी केला आहे.