महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धा – पहिल्या सुवर्णपदकाचा मान अहिल्यानगरला! कर्जतच्या सचिन मुरकुटेची गादी विभागातील 57 किलो गटात बाजी

>> गणेश जेवरे

यजमान अहिल्यानगर जिल्ह्याने प्रतिष्ठेच्या 66व्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा बहुमान मिळविला. कर्जतमधील कोरेगावच्या सचिन मुरकुटे याने गादी विभागातील 57 किलो गटाच्या फायनलमध्ये मुंबई शहरच्या सचिन चौगुलेला चीतपट करून सुवर्णपदकावर रुबाबात आपले नाव कोरले. ‘लोकल बॉय’च्या या सोनेरी यशानंतर तमाम कुस्तीशौकिनांनी जबरदस्त जल्लोष केला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने, आमदार रोहित पवार मित्रपरिवार व अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या विद्यमाने कर्जत येथील श्री संत सद्‌गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील तसेच महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील कुस्त्यांना प्रारंभ झाला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या सचिन मुरकुटेने गादी विभागातील 57 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक दिल्याने कुस्तीप्रेमींनी सुवर्णपदकाच्या या लढतीसाठी तोबा गर्दी केली होती. सचिन मुरकुटेने प्रतिस्पर्धी सचिन चौगुलेला मोठ्या चपळाईने एकचाकी डावावर चीतपट करून स्पर्धेतील पहिला सुवर्णवीर मल्ल होण्याचा मान मिळविल्या. त्याच्या या यशाने प्रेक्षकांना अक्षरशः आखाडा डोक्यावर घेतला.

गादी विभागातील 65 किलो गटाच्या उपांत्य फेरीत हर्षवर्धन भुजबळकर विजयी झाला. त्याने प्रितेश भगतचा पराभव केला. दुसरा उपांत्य सामना छत्रपती संभाजीनगर येथील करण बागडे विरुद्ध सातारचा विशाल सुळ यांच्यामध्ये झाला. यामध्ये विशाल सुळ विजयी झाला असून, त्याची अंतिम लढत मुंबई उपनगरच्या हर्षवर्धन भुजबळकर याच्याशी होणार आहे.

74 किलो गादी विभागातील उपांत्य फेरीत पुणे शहरच्या आकाश दुबे याने सांगलीच्या योगेश मोहितेचा पराभव केला. दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या केतन खारेने कोल्हापूरच्या सचिन बाबरला लोळवून अंतिम फेरी गाठली. आता आकाश दुबे व केतन खारे सुवर्णपदकासाठी झुंजतील.

57 किलो माती विभागच्या उपांत्य फेरीत पुण्याच्या यश बुदखुडे याने सांगलीच्या स्वप्नील पवारचा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत कोल्हापूरच्या अजिंक्य मानकर याने सोलापूरच्या विशाल सुरवसेला पराभूत केले. आता यश बुदगुडे व अजित मानकर यांच्यात अंतिम कुस्ती रंगेल.

65 किलो माती विभागाच्या उपांत्य फेरीत पुणे जिल्ह्याच्या सूरज कोकाटेने सोलापूरच्या अनिकेत शिंदेला अस्मान दाखवित अंतिम फेरीत धडक दिली. दुसऱ्या लढतीत सांगलीच्या तेजस पाटीलने जालनाच्या इमरान सय्यदवर विजय मिळवित अंतिम फेरी गाठली.

74 किलो माती विभागाच्या उपांत्य फेरीत पुणे शहरच्या श्रीकांत दंडेने अहिल्यानगरच्या प्रकाश कारलेने पराभव केला, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या सागर वाघमोडेने बुलढाण्याच्या संकेत हजारचा पराभव केला. आता श्रीकांत व सागर विजेतेपदासाठी भिडतील.