वादग्रस्त मोहोळ-राक्षे लढतीच्या चौकशीसाठी तज्ञ समितीची नियुक्ती

67 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खुल्या गटातील गादी विभागाच्या अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यातील कुस्ती पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निकालानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. पंचांवर जाहीरपणे आरोप व नाराजी व्यक्त होत असल्याने राज्य कुस्तीगीर संघाने मोहोळ व राक्षे यांच्या लढतीची चौकशी करण्यासाठी तज्ञ समितीची नेमणूक केली आहे.

या समितीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा. विलास कथुरे यांच्यासह चार तज्ञ पदाधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करणार आहे, अशी माहिती राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव, हिंद केसरी योगेश दोडके यांनी दिली.

याबाबत दोडके यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे,  अहिल्यानगरमध्ये पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यातील कुस्तीच्या निकालावरून बराच गदरोळ निर्माण झाला. स्पर्धा संपल्यानंतर जनमानसातसुद्धा निकालावरून नाराजी व्यक्त होत आहे. या निकालाविरुद्ध राक्षे यांनी कोणतीच हरकत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे नोंदवली नाही. परंतु समाजात सदर निकालाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चेचा विचार करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पाचजणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.