मिंधेंनी महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत ढकलले; दरडोई उत्पन्नात देशात 11व्या स्थानावर घसरण

मिंधे सरकारच्या राजवटीत राज्याच्या दरडोई उत्पन्नात घट होऊन महाराष्ट्र रसातळाला पोहचला आहे. राज्यावरील कर्जाच्या बोजात वर्षभरात 76 हजार 539 कोटींची वाढ होऊन कर्जाचा डोंगर 7 लाख 82 हजार 981 कोटी रुपयांवर पोहचला आहे. गोवा, सिक्कीम, केरळ ही लहान राज्ये आणि पुद्दुचेरी, या केंद्र शासित प्रदेशांचा विचार करता महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात सहाव्या नाही तर अकराव्या क्रमांकावर असल्याची कबुली उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. वर्षभरात राज्याच्या कर्जात 10.37 टक्के वाढ झाल्याचेही त्यांनी मान्य केले.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार बोलत होते. अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी लहान राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात अकराव्या क्रमांकावर असल्याचे मान्य केले.

विरोधकांचा सभात्याग
दरम्यान, अजित पवार यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सभागृहात बोलू दिले नाही म्हणून विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

…म्हणे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर्ज
कर्जाचा उपयोग राज्यात उत्पादक मत्ता निर्माण करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, त्यातून रोजगार निर्मिती करणे, उत्पादनात वाढ करणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे यासाठी केला जातो. त्यामुळे कर्ज रक्कम वाढत असली तरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आपण कर्ज घेत आहोत, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

कर्जाचा वाढता भार
राज्यावर कर्जाचा भार वाढत असल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यावर बोलताना, राज्यावर 2023-24 मध्ये 7 लाख 6 हजार 442 कोटी रुपयांचे अंदाजित कर्ज होते. 2024-25 मध्ये 7 लाख 82 हजार 981 कोटी रुपये कर्ज आहे. कर्जात 10.37 टक्के वाढ दिसत असल्याचे अजित पवार यांनी मान्य केले.

आमदार-खासदार आले गेले, पण…
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर बोलताना त्यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटाप्रमाणे ‘बॉम्बे टू गोवा नॅशनल हायवे’ असा चित्रपट काढायला लागेल किंवा पुस्तक लिहायला लागेल. या हायवेच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सर्वच जण जबाबदार आहोत. खासदार करा, आमदार करा, मी हा रस्ता पूर्ण करून दाखवतो असे सांगून कितीतरी आमदार, खासदार झाले, पण हा रस्ता काही पूर्ण झाला नाही, अशी कबुली अजित पवार यांनी दिली.