
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे अवघा देश दुखवटा पाळतोय; पण सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नाही. अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सोहळ्यांमध्ये रमले आहेत. अजितदादा गटाने आज आपल्या महाराष्ट्र गौरव यात्रेचा शुभारंभ केला, तर उद्या भाजपचे नेते आणि मंत्र्यांचा भव्य सत्कार सोहळा होणार आहे.
अजित पवार गटाने आज महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ केला. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते थाटामाटात हा सोहळा पार पडला. मुंबईत होणाऱया महाराष्ट्र महोत्सवासाठी हुतात्मा स्मारके, मंदिरे, दर्गा, गुरुद्वारा, तीर्थस्थळे या ठिकाणची पवित्र माती, याशिवाय नद्यांचे जल आणि गडकिल्ल्यांची माती आणण्यासाठी या रथावर मंगलकलश ठेवला गेला आहे. यावरून अजित पवार गटावर टीका होत आहे. दरम्यान, सत्कारसोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत्य असून, सत्कारसोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? हीच भाजपाची संस्कृती आहे का, असा संतप्त सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.