गद्दार मिंधेंमुळे राज्यात अराजक, गृहमंत्री डर्टी पॉलिटिक्समध्ये व्यग्र; नागपुरातील अत्याचाराच्या घटनेवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर युवासेनाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री फोटो काढण्यात व्यग्र आहेत. तर गृहमंत्री चिखलफेकीच्या राजकारणात व्यग्र आहेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

नागपूरमधील पारडी येथे या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. गेल्या रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे मुलीच्या लहान बहिणी समोरच हा प्रकार घडला. नराधमाने पीडितेच्या लहान बहिणीला 20 रुपये देऊन तिला गप्प राहण्यास सांगितलं. घटनेला 24 तास होऊन गेल्यानंतरही आरोपीला अटक झालेली नव्हती. पीडित मुलीचे आई-वडील हे मजूर आहेत. ते मजुरीसाठी गेले असताना ही घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. या घटनेवरू शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर बोट ठेवले आहे.

महाराष्ट्रात घटनाबाह्य आणि निर्लज्ज मुख्यमंत्री, गद्दार मिंधे यांचं अज्ञानी सरकार आहे. सेलिब्रेटींसोबत स्वतःचे फोटो काढण्यात व्यग्र आहेत. यामुळे राज्यात अराजकतेची स्थिती आहे. कायद्याची भीती उरलेली नाही. तर गृहमंत्री डर्टी पॉलिटिक्समध्ये व्यग्र आहेत, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.