
पर्यटकांची होणारी दिशाभूल आणि लुटमारीविरोधात कालपासून माथेरानकरांनी पुकारलेले बेमुदत बंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशी मागे घेतले. आंदोलनाच्या दणक्यानंतर प्रशासनाने पर्यटकांच्या माहितीसाठी प्रवेशद्वारावर माहिती केंद्र उभारतानाच माथेरानचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर परिषदेच्या या आश्वासनानंतर संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांपासून शुकशुकाट पसरलेले जगप्रसिद्ध माथेरान हजारो पर्यटकांनी पुन्हा एकदा गजबजून गेले आहे.
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना खोटी माहिती देत घोडेचालक, हमाल, रूम्सचे एजंट आणि गाईडकडून लूटमार केली जाते. त्यांच्याकडून अवाचे सवा रक्कम उकळली जाते. या लुटमारीविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने आवाज उठवत नगरपालिका प्रशासन, वनखाते, पोलीस यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने 18 मार्चपासून माथेरानमध्ये बेमुदत बंदची हाक दिली.
रिक्षाचालक, अश्वपाल एकाच ठिकाणी
तातडीने आज बाळासाहेब ठाकरे सभागृहात एक बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रांत अधिक प्रकाश संकपाळ, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे, तसेच माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनविभागाचे अधिकारी तर माथेरान बचाव समिती व अश्वपाल संघटना, टॅक्सी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एकाच ठिकाणी रिक्षाचालक व अश्वपाल उभे राहतील असा निर्णय घेण्यात आला.