
आरोग्य विभागातील अधिकारी पैशासाठी किती खालच्या थरावर जाऊ शकतात याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. अन्यायाविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी एका डॉक्टरचे करिअरच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. बनावट कागदपत्रे बनवून त्या डॉक्टरला मुन्नाभाई ठरवले. त्याविरुद्ध त्या डॉक्टरने कायदेशीर लढा दिल्यानंतर संबंधित आरोग्य अधिकाऱयांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहसीन खान यांच्याविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर यांनी एप्रिल 2023 मध्ये गुन्हा दाखल केला होता. मोहसीन खान यांची डिग्री बनावट असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यानंतर खान यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर सोन्याबापू शेळके, सिल्लोड तालुका आरोग्य अधिकारी नासेर अहमद खान व आरोग्यसेवक किरण मोतीराम सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. अहमद खान यांनी सिल्लोडच्या आरोग्य अधिकारी पदावर नेमणूक व्हावी म्हणून वरिष्ठांकडे तगादा लावला होता. त्यामुळे डॉ. शेळके हे खान यांची वेळोवेळी प्रतिनियुक्ती करत होते. ती नको असेल तर तीस हजार रुपयांची मागणी शेळके यांनी केली होती आणि त्यास नकार दिल्याने खान यांच्याविरुद्ध छेडछाडीच्या गुह्याबरोबरच बनावट डिग्री बाळगल्याचा ठपका ठेवण्यात आला.
डॉ. मोहसीन खान यांना बोगस ठरवण्यासाठी खोटय़ा डिग्रीची बनावट कागदपत्रे तयार केली गेली. खान यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्यानंतर संबंधित आरोग्य अधिकाऱयांवर गुन्हा दाखल झाला. चौकशीसाठी पोलिसांनी डॉ. शेळके यांच्या घरावर धाड टाकली तेव्हा त्यांच्याकडे खान यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे सापडली.