देशात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर, आरोग्य विभागाकडून गाईडलाईन्स जारी

देशात एचएमपीव्ही विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. एचएमपीव्ही विषाणूबाबत चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाची महत्वाची बैठक होणार आहे. एचएमपीव्ही विषाणूबाबत आरोग्य विभागाकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

बंगळुरूतील आठ महिन्यांची चिमुकली एचएमपीव्ही विषाणूबाधित झाली आहे. यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. घाबरु नका पण सतर्क रहा अशा आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. स्वच्छता ठेवा, सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

काळजी करू नका, आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करा – आरोग्यमंत्री

एचएमपीव्ही विषाणूबाबत आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या परवा एक बैठक होईल. जो व्हायरस आलेला आहे, त्याचा बंगळुरूमध्ये एक रुग्ण आढळला असला तरी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या असं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.