महाराष्ट्रासह चार राज्यांचे निवडणूक निकाल देशाचे राजकारण बदलतील

लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि भावना आपल्याला जपायची आहे. देशातील वातावरण आपल्या बाजूने असून यापुढेही ते कायम ठेवण्यासाठी काम करा. महाराष्ट्रासह चार राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल देशाचे राजकारण बदलतील, असा विश्वास काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.

जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. या वेळी उपस्थित काँग्रेस खासदारांना मार्गदर्शन करताना सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने आत्मसंतुष्ट होऊन अतिआत्मविश्वासात राहू नका. तर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-कश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज होऊन कामाला लागा. या चार राज्यांत चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात निश्चितच मोठा बदल दिसून येईल, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

मोदींकडून देशात भीतीचे वातावरण

महागाईने देशभरातील कोटय़वधी कुटुंबे उद्ध्वस्त झाल्यामुळे केंद्र सरकारमध्ये, विशेषतः त्यांच्या उच्च नेतृत्वामध्ये मोठय़ा प्रमाणावर निराशा आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यातून मोदी सरकार धडा घेईल, असे आम्हाला वाटत होते. पण तसे झाले नाही. उलट मोदी देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे त्यांचे धोरण सुरूच असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.

कावड यात्रेच्या मार्गावर दुकानदारांची नावे लिहिण्याच्या यूपी-उत्तराखंड सरकारच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळी हस्तक्षेप केला. हा केवळ थोडय़ा काळासाठी दिलासा असू शकतो.

सरकारी कर्मचाऱयांना आरएसएसच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी अचानक नियम बदलला. आरएसएस एक सांस्कृतिक संघटना म्हणवते, पण ती भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे.

कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटना हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या काही आठवडय़ांत एकटय़ा जम्मू भागात किमान अकरा हल्ले झाले यावरून तेथील परिस्थिती सामान्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.

2021पासून जनगणनेचा विषय प्रलंबित आहे. यामुळे देशाची लोकसंख्या, विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची संख्या कळत नाही. यामुळे किमान 12 कोटी नागरिक पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

जग फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत

मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत आहेत, पण मणिपूरला जाऊन तेथील परिस्थिती सामान्य करण्यासाठी पुढाकार घेण्यास ते नकार देत असल्याचे दिसत असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.

अर्थसंकल्पात शेतकरी आणि तरुणांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे लोकांमध्ये निराशा आहे. केंद्र सरकार आत्मभ्रमात आहे. वाढत्या बेरोजगारी आणि महागाईमुळे देशभरातील कोटय़वधी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.