ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला परिवहन विभागाची नोटीस, व्यापार प्रमाणपत्राशिवाय दुकाने सुरू ठेवल्याने अडचणीत

1988 चा केंद्रीय मोटार वाहन कायदा आणि 1989 च्या केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत व्यापार प्रमाणपत्र न मिळवणारे वाहन वितरक व उत्पादक परिवहन विभागाच्या कचाटय़ात सापडले आहेत. व्यापार प्रमाणपत्राशिवाय दुकाने सुरू ठेवणाऱया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी पंपनीला परिवहन विभागाने नोटीस बजावली असून व्यापार प्रमाणपत्र न मिळवल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायदा व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किंवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ट प्रतिष्ठान, शोरूम किंवा डीलरशिप यांनी नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे व्यापार प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या वाहन वितरक व उत्पादकांनी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 192 नुसार दंडास पात्र असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडला नोटीस बजावली आहे. राज्यातील अनेक दुकाने रीतसर व्यापार प्रमाणपत्राशिवाय सुरू असल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे.

हा गंभीर मुद्दा! 

व्यापार प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय करणे हा गंभीर मुद्दा आहे, असे परिवहन विभागाने ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडला धाडलेल्या नोटिसीत म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकने 2022 पासून 4 हजार दुकाने उघडली आहेत, तर 3,400 शोरूमपैकी केवळ 100 शोरूमकडे व्यापार प्रमाणपत्र आढळून आले. 95 टक्क्यांहून अधिक स्टोअरमध्ये प्रमाणपत्र नव्हते, असे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.