राज्यातील वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली नेमक्या किती जमिनी आहेत, त्या जमिनींची सद्यस्थिती काय आहे, याचा संपूर्ण लेखाजोखा आता तयार होणार आहे. राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने तज्ञ संस्थांच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या राज्यातील जमिनींची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे.
संपूर्ण देशात वक्फ बोर्डाच्या विविध ठिकाणी जमिनी आहेत. त्यामुळे केंद्रीय पातळीवर या जमिनींचा लेखाजोखा तयार करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर राज्याच्या अल्पसंख्याक विभागानेदेखील अशा जमिनी राज्यात किती आहेत याची इत्थंभूत माहिती जमा करण्याची तयारी सुरू केली आहे. तज्ञ संस्थांच्या माध्यमातून अशा जमिनी नेमक्या कुठे आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, त्या जमिनींचा वापर कशासाठी केला जातोय, जमिनींवर अतिक्रमण झाले आहे का, त्या जमिनींचा बाजारभाव किती असेल, ही आणि अशी अन्य संबंधित माहिती आता अल्पसंख्याक विभागाच्या वतीने एकत्रित करण्यात येणार आहे. शिवाय संगणकावर एका क्लिकवर ही माहिती जनतेला जाणून घेता येईल, असे एका अधिकाऱयाकडून सांगण्यात येते. लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल असेही ते म्हणाले.
पारदर्शकता राहील
सद्यस्थितीत राज्यात वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली कुठे आणि किती जमिनी आहेत त्याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. परिणामी त्या जमिनींचा वापर कशासाठी होतोय, त्यावर अतिक्रमण झाले आहे का? याबाबत काहीच समजून येत नाही. त्यामुळे या जमिनीबाबत पारदर्शकता राहावी. नेमकी किती एकर जागा राज्यात आहे हे समजेल. वफ्कच्या जमिनीबाबत कुठलाही गोंधळ होणार नाही असे ही सांगण्यात येते.