राज्य सरकार दर महिन्याला तीन हजार कोटी रुपये कर्ज काढत आहे. सरकारने योजना तर जाहीर केल्या आहेत. पण राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेचे दार ठोठावले आहे.
साम मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्यानुसार गरजू महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. पण या योजनेसाठी सरकारवर कर्ज वाढत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 52 लाख अर्ज आले आहेत. तर त्यापैकी 2 कोटी 41 लाख अर्ज मंजूर झाले आहेत. त्यातील 1 कोटी 85 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळायला सुरूवात झाली आहे. लाभार्थी महिलांना देण्यासाठी राज्य सरकारला महिन्याला 3 हजार 620 कोटी रुपयांची गरज आहे. तर वर्षाला या योजनेसाठी 43 हजार 440 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. यामुळे तिजोरीत खडखडाट असताना निधीसाठी सरकारने आरबीआयकडे मागणी केली आहे. दुसरीकडे निधी जुळवण्यासाठी सरकारने 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद केले असून फक्त 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर सुरू केले आहेत.