महाराष्ट्रातही धक्कातंत्र? मुख्यमंत्रीपदासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा, स्वत: दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस उलटून गेले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीची शुक्रवारी मुंबईत बैठक होणार होती. दिल्लीश्वरांनी मिंधेंच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ गावी धाव घेतली.

अशातच सोशल मीडियावर मुख्यमंत्रीपदासाठी भाजप हायकमांड नवीन नावावर मोहोर उमटवू शकते अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणे भाजप महाराष्ट्रातही धक्कातंत्र वापरणार अशी चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्रीपदासाठी पुण्याचे खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल वाढली. संभ्रम वाढत चालल्याने अखेर मुरलीधर मोहोळ यांनी यावर एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले.

दिल्लीहून परतताच तब्येत बिघडली, शिंदे विश्रांतीसाठी गावाला गेले; महायुतीची बैठक रद्द!

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत सर्व चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले. ते म्हणाले, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.

आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.