पुण्यात भाजपच्या इच्छेला दिला धक्का, पालकमंत्रिपदी अजित पवार यांचा झेंडा

पुणे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नऊ आमदार असल्याने पुण्याच्या पालकमंत्रिपदावर भाजपने दावा केला होता; परंतु त्यांच्या इच्छेला धक्का देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर आपला झेंडा कायम ठेवला आहे. पुण्याबरोबरच अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचेदेखील जबाबदारी घेतली आहे.

पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 आमदारांपैकी नऊ आमदार भाजपचे आहेत. त्याखालोखाल अजित पवार गटाचे आठ आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी सर्वाधिक आमदार असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर होते; परंतु महायुतीच्या पालकमंत्रिपदाच्या जागावाटपामध्ये पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांनी स्वतःकडे घेण्यात यश मिळविले आहे.

चंद्रकांत पाटील यांना सांगलीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे. माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूरच्या सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. पुण्याचा जिल्हा नियोजन समितीचा आराखडा सुमारे साडेबाराशे कोटींचा आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व खात्यांच्या जिल्हा परिषदेबरोबरच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस आणि संबंधित खात्यांची बैठक घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना आहेत. पालकमंत्रिपद ताब्यात घेऊन अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व राहणार, हे सिद्ध केले आहे.

महायुतीत निधीवाटपाचे सूत्र कसे राहणार?

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहे. अशा वेळी जिल्हा नियोजन समितीमधील विकासकामे, तसेच शहरातील प्रमुख प्रकल्पांसाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. निधीवाटप करताना महायुतीमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार हे स्वतःच्या पक्षाला अधिक निधी पदरात पाडून घेतात. निधी वाटपावरून महायुतीमधील कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्यामुळे येत्या पाच वर्षांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपाचे धोरण महायुतीमध्ये कसे राहणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.