महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांची मते मिळवण्यासाठी घाईघाईत लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. कोणतेही निकष न लावता केवळ मतांसाठी आणलेल्या या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारने आता लाडक्या बहिणींचे लाड पुरवण्यासाठी भुकेलेल्यांचा घास हिरावण्याची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी आणि मिंधे सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत, असे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिली आहे.
शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजनेवर चालू आर्थिक वर्षात 1,300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत खडखडाट झाला असून शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन्ही योजनांना कात्री लावण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवभोजन थाळी योजना बंद करु नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी योजना श्रमीक, कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी सुरू केली होती. पण सरकारला आता गोरगरिबांना अन्न पुरवणे परवडत नाही. कारण आता राजकारणात त्याचा उपयोग नाही. भुजबळांनी हा विषय मांडला असून त्यांच्या मागे उभे राहू, असे राऊत म्हणाले.
शिवभोजन थाळी योजना बंद करू नये
महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला 10 रुपयात चांगले अन्न मिळते. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
शिवभोजन थाळी बंद करून गरजू निराधारांना सन्मानाने मिळणारा तोंडाचा घास हिसकावून घेण्याचा निर्णय आता महायुती सरकार घेत आहे.
चार महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ निराधारांना मिळालेला नाही. गरीब निराधारांच्या योजनांना कात्री लावणारे निर्दयी सरकार आज महाराष्ट्रात आहे.… pic.twitter.com/iBgG6SjUgI
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2025