
महाराष्ट्रातून उद्योग, व्यापर पळवला. गुजरातमध्ये अनेक कंपन्या नेल्या. यावर सत्ताधाऱ्यांचे भागलेले दिसत नाही. आता महाराष्ट्रासाठी पदभरती होत असताना त्याची परीक्षा गुजरातच्या गांधीनगरमध्ये घेतली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
17 डिसेंबर 2024 च्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये कंत्राटी भरती केली जात आहे. वैज्ञानिक सहायक ही पदे फॉरेन्सिक ॲप्टीट्युड अँड कॅलिबर टेस्ट (एफएसीटी) ही परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांमधून भरली जात आहेत. तर सहायक रासायनिक विश्लेषकांची 166 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीला कंत्राट दिले आहे. त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यासाठी पुढच्या महिन्यात 5 आणि 7 एप्रिलला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी गुजरातमधील राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे.
खासगी कंपनीमार्फत 5857 पदे भरण्याचा राज्य सरकारचा जीआर मॅटकडून रद्द
महाराष्ट्राच्या फॉरेन्सिक लॅबसाठी पदभरती असताना त्याची परीक्षा गुजरातमध्ये का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात परीक्षेसाठी एकही केंद्र का नाही? गुजरातला जाण्यासाठी रेल्वेची थेट सुविधा नाही, असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थी हे परीक्षेपासून वंचित राहणार, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र मंजूर करावं, अशी मागणी करण्यात आली आहे. फरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.