मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि कोकणमध्ये ढगाळ वातावरण असल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रत थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यामधील काही भागात थंडी वाढल्याने गारठा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान घटले असून राज्यात नगरमध्ये सर्वांत कमी तापमानाची म्हणजे 10. 5 अंश सेल्सिअसची नोंद झाली. मुंबईत पारा 21 अंशांवर आहे. तर पुण्यात 12 अंशावर पारा आहे. राज्यात काही भाग थंडीने गारठले आहेत. आता पुढील दोन दिवसांमध्ये गारठा कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे आणि कोकणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात किमान तापमानात घट होत आहे. मात्र, येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रमाण आणि ढगाळ वातावरण यामुळे थंडीत चढउतार होत असतात. आता ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असल्याने तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे.
गेल्या आठवड्याभरात राज्यात काही ठिकाणी गारठा वाढला होता. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेले. तर काही भागात उन्हाचे प्रमाण वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे. आता राज्यात इतर ठिकाणीही थंडीचे प्रमाण कमी होणार असून तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.