वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण (एमएसईबी) कंपनीच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) 28 मार्च रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून नव्या दरकपातीचा निर्णय लागू होणार होता, परंतु त्यामध्ये काही चुका असल्याचे महावितरणने निदर्शनास आणले आहे. त्यामुळे आता महावितरणकडून करण्यात आलेल्या दरकपातीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून ग्राहकांना झटका बसणार आहे.

वीज दर आदेशातील चुका आणि विसंगती या वर्ष 2025-26 ते 2029-30 या पाच वर्षांच्या नियामक कालावधीतील वीज दराच्या मूळ स्वरूपावर परिणाम करत आहेत. तसेच हा दर लागू केल्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना आणि वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या आदेशावर तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी महावितरणने केल्याचे महावितरणच्या वकिलांनी सांगितले. तसेच यासंदर्भात सविस्तर पुनरावलोकन याचिका एप्रिलच्या अखेरीस सादर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.