महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे वणी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ विराट सभा घेतली. या सभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी हेलिपॅडच्या ठिकाणी तपासल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. जाहीर सभेतूनही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
सभेसाठी हेलिकॉप्टरने आल्यावर 8-10 जण स्वागतासाठी उभे होते. बॅग तपासली, त्यांचा व्हिडीओ काढला. जशी माझी बॅग तपासली तशी मोदी, शहांची बॅग तपासली का? दाढीवाल्या मिंध्यांची, गुलाबी जॅकीटची आणि देवेंद्रचीही तपासायला हवी. पंतप्रधान, मिंधे, देवेंद्र किंवा अजित पवारांच्या बॅगा निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तुम्हालाही चौकशीसाठी, तपासणीसाठी अडवले तर त्यांचे ओळखपत्र, नेमणूकपत्र तपासा, त्यांचेही खिसे तपासा. हा मतदात्याचा मुलभूत अधिकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
कलम 370 काढणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे बसले असे विधान करणाऱ्या अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. कलम 370 काढताना उद्धव ठाकरे तुमच्याबरोबर बसले होते. तुम्ही मला ढकललंत, मग मी तुम्हाला लाथ मारली, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
कश्मीरमधले 370 कलम काढले तेव्हा शिवसेनेने पाठिंबा दिला. पण तुम्ही कश्मीरमध्ये काढलेले 370 कलम माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव देणार नाही. युवकांना रोजगार देणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही सोयाबीनला भाव दिला, कापसाला भाव दिला. जी आपत्ती आली त्यावेळी नुकसान भरपाई दिली. आता पिकविण्याचे पैसे मिळतात का? सोयाबीनला, कापसाला भाव मिळतो का? असा सवाल विचारताच प्रचंड सभेतून नाही असा आवाज घुमला. आता सोयाबीन, कापसाचा भाव, पिकविमा, रोजगार, नुकसान भरपाई, महिला सुरक्षा या सगळ्यांना एकच उत्तर मिळते ते म्हणजे कलम 370 काढले, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत बसले होते. आजही काँग्रेसोबत आहे. ते बाळासाहेबांची एक क्लिप फिरवतात. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बाळासाहेब हे बोलले होतेच, पण बाळासाहेब कमळाबाईसुद्धा बोलले होते. कमळाबाईची मस्ती चालू द्यायची नाही हे देखील बाळासाहेब बोलले होते, ते दाखवत नाहीत. 25-30 वर्ष भाजपसोबत राहिल्यानंतर शिवसेनेची भाजपा नाही झाली आता काँग्रेससोबत राहिल्यावर शिवसेनेची काँग्रेस कशी होईल? मोदींचा भाजप मेहबुबा मुफ्तींबरोबर कश्मीरमध्ये सत्तेत बसला, म्हणून भाजप पीडीपी झाला का? चंद्राबाबू यांच्याबरोबर बसले मग त्यांचे झाले का? संघमुक्त भारत बोलणाऱ्या नितीश कुमार यांच्यासोबत बसले, मग भाजप जेडीयू झाला का? असा सवाल करत या सगळ्या थापा असून तुम्ही संभ्रमात राहू नका, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
– 20 तारखेला डोळ्यावर पट्टी बांधू देऊ नका. आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढलेली आहे, तुम्हालाही डोळसपणे मतदान करायचे आहे.
– सभेसाठी हेलिकॉप्टरने आल्यावर 8-10 जण स्वागतासाठी उभे होते. बॅग तपासली, त्यांचा व्हिडीओ काढला. तुम्हालाही चौकशीसाठी, तपासणीसाठी अडवले तर त्यांचे ओळखपत्र, नेमणूकपत्र तपासा, त्यांचेही खिसे तपासा. हा मतदात्याचा मुलभूत अधिकार आहे.
– जशी माझी बॅग तपासली तशी मोदी, शहांची बॅग तपासली का? दाढीवाल्या मिंध्यांची, गुलाबी जॅकीटची आणि देवेंद्रचीही तपासायला हवी. पंतप्रधान, मिंधे, देवेंद्र किंवा अजित पवारांच्या बॅगा निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील.
– अदानी हा राक्षस मुंबईपुरता नाही. चंद्रपूरची शाळाही अदानीला दिली. देशातील सगळे प्रमुख एअरपोर्ट, पोर्ट अदानीकडे दिले.
– मोदी, शहा इकडे फिरताहेत. हिंदू- मुसलमान दंगे भडकावण्याचा प्रयत्न करताहेत. बटेंगे तो कटेंगे म्हणतात, पण हम बटेंगे भी नही, कटेंगे भी नही, हम आपको लुटने भी नही देंगे. हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेंगे ही भाजपची नीती आहे.
– स्वत: मोदींना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मत मागावे लागत आहेत. ही आपल्या बाळासाहेबांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांचे कर्तुत्व आहे.
– महाराष्ट्रामध्ये खोटी मोदी गॅरंटी चालत नाही. इकडे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाणे खणखणीत चालते.
– कश्मीरमध्ये जाताय तसे मणिपूरला का गेला नाहीत? तिथे आजही अत्याचार चालू आहेत. मोदी, शहा इकडे भाषण देत असताना मणिपूरमध्ये महिलेवर अत्याचार करून जिवंत जाळून टाकण्यात आले. मोदी त्याबाबत बोलत नाहीत.
– गांडुळांची पैदास महाराष्ट्रात होत नाही, महाराष्ट्रामध्ये वाघांची पैदास होते
– महाराष्ट्रात महिला अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असणारे महिलांसाठीचे पोलीस स्टेशन उभारणार
– शेतकऱ्याचे नुकसान होऊ न देता जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेऊन दाखवणार.
– निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार
– मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार
– महाराष्ट्रातून गुजरातला लुटून नेलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणणार
– सरकार आल्यावर अदानीच्या घशामध्ये घातलेली मुंबई आणि आसपासची जमीन काढून महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांसाठी परवडणाऱ्या किंमतीत घर देऊन दाखवणार