Maharashtra election 2024 – कल्याण पूर्वेत मिंध्यांचे भाजपविरोधात बंड, सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजप आणि मिंधे गटात धुसफूस सुरू झाली आहे. कल्याण पूर्वेत मिंधे गटाने पत्रकार परिषद घेऊन सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपविरोधात उघड बंड केले आहे. त्यामुळे दोन्ही गटांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

भाजपच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याच्या 24 तासांतच महायुतीमध्ये बंडाचे फटाके फुटू लागले आहेत. त्यामुळे भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे. मिंधे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला. गणपत गायकवाड यांच्यामुळे पंधरा वर्षांपासून कल्याण पूर्वेचा विकास रखडला आहे. तरीही भाजपने पुन्हा त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने त्यांच्या प्रचारात शिंदे गट सहभागी होणार नाही, असा इशारा महेश गायकवाड यांच्यासह मल्लेश शेट्टी, नीलेश शिंदे, संगीता गायकवाड, प्रमोद पिंगळे, सारिका जाधव, रमाकांद देवळेकर, कल्याण धुमाळ, शरद पावशे, विशाल पावशे यांनी दिला आहे.

नेमका वाद काय?

जमीन व्यवहाराच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनातच गोळीबार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाड सध्या तळोजा जेलमध्ये आहेत. आता भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने भाजप आणि मिंधे गटातील वाद आणखीच चिघळला आहे.

दोन वर्षे सत्ता भोगल्यानंतर मिंधेंना उपरती

■ भाजपमुळे कल्याण पूर्वेकडील भाग भकास.
■ गणपत गायकवाड यांनी भ्रष्टाचार करून स्वतःचे घर भरले
■ उमेदवार बदलला नाही तर अपक्ष लढणार
■ मिंधे गटासाठी आजचा दिवस काळा

मुख्यमंत्री बंडाचे सूत्रधार?

मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातच मिंधे गटाने भाजपला थेट आव्हान देत कमळाचा प्रचार करणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या बंडाला पाठिंबा असून तेच या बंडाचे सूत्रधार असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करूनही आता मात्र मिंधे गट दगाबाजी करत असल्याचा संताप भाजप कार्यकर्ते करत आहेत.