रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघात 13 लाख 23 हजार 413 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 6 लाख 39 हजार 016 पुरुष आणि 6 लाख 84 हजार 387 महिला मतदार आणि 10 तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण 1 हजार 747 मतदार केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेवर यंदा सीसीटिव्हीची नजर राहणार आहे. त्याकरीता मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही लावण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेत काही विशेष मतदान केंद्रेही निश्चित करण्यात आली आहेत. महिला अधिकारी आणि कर्मचारी असलेली सहा मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये दापोली, गुहागरमधील बोरज, चिपळूणमधील मुरादपूर आणि देवरुख, रत्नागिरीतील नगरपरिषद प्रभाग क्र.4 आणि 6, राजापूरमधील भातळी या मतदान केंद्रांचा समावेश आहे.
दिव्यांग कर्मचारी असलेल्या मतदान केंद्रामध्ये दापोलीतील बिंबवणे, गुहागरमधील आवाशी, चिपळूणमधील कावीळतळी आणि देवरुख, रत्नागिरीतील खेडशी, राजापूरमधील गोंदेसकळ. तरुण कर्मचारीवर्ग असलेल्या 5 मतदान केंद्रांमध्ये दापोलीतील जालगाव, गुहागरमधील देवपाट, चिपळूणमधील देवरुख, रत्नागिरीतील नाचणे कोकणनगर आणि राजापूरातील लांजा या मतदार केंद्रांचा समावेश आहे.
20 हजार 871 मतदार पहिल्यांदाच हक्क बजावणार
विधानसभा निवडणूकीत रत्नागिरी जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील 20 हजार 871 मतदार पहिल्यांदा आपला हक्क बजावणार आहेत. 85 वयोगटावरील 19 हजार 316 मतदार आहेत. या 85 वयोगटावरील मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे.
सोशल मिडीया आणि फेक न्यूजवर करडी नजर
निवडणूकीच्या काळामध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जातात किंवा एखाद्या उमेदवाराची बदनामी केली जाते. एखाद्या उमेदवाराचा एआयच्या माध्यमातून डिपफेक व्हिडीओ बनवून बदनामी केली जाते. या सर्व प्रकारावर करडी नजर आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकणी यांनी सांगितले. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येणार असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बॅनर्स आणि होर्डिंग हटवण्यात आली आहेत. निवडणूकीच्या काळात होणाऱ्या बेकायदेशीर मद्यविक्रीवरही कारवाई करण्यात येणार आहे.