Maharashtra election 2024 – रायगडातील 24 लाख मतदार निवडून देणार 7 आमदार

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 24 लाख 68 हजार मतदार रायगड जिल्ह्यातील सात आमदार निवडून देणार आहेत. जिल्ह्यात 2 हजार 790 केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून विविध 190 पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये 24 लाख 68 हजार 120 मतदार आहेत. सर्वात जास्त 6 लाख 45 हजार 917 मतदार पनवेल मतदारसंघात असून 2 लाख 63 हजार 921 मतदार श्रीवर्धन मतदारसंघात आहेत. तर कर्जत 3 लाख 16 हजार 603, उरण 3 लाख 36 हजार 225, पेण 3 लाख 6 हजार 961, अलिबाग 3 लाख 3 हजार 597, महाड 2 लाख 95 हजार 216 मतदार आहेत.

कोणत्या मतदारसंघात किती केंद्रे

जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी 2 हजार 790 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 574 मतदान केंद्रे असून कर्जत 362, उरण 355, पेण 380, अलिबाग 375, श्रीवर्धन 351, महाड 393 मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी 17 हजार 497 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

विविध 190 पथके स्थापन

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी लक्ष ठेवण्यासाठी विविध 190 पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये ६61 भरारी पथके, 73 स्थिर सर्वेक्षण पथके, 37 व्हिडीओ चित्रीकरण पथके तर 19 इतर पथकांचा समावेश आहे.

परवानाधारकांना शत्र जमा करण्याचे आदेश

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ज्या नागरिकांकडे परवानाधारक शस्त्रे आहेत ती जमा करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ज्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यांना तात्पुरते तडीपार करण्यात येणार आहे. अवैध मद्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ठिकठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्यात येणार आहे.