पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा – पुन्हा एकदा बागवे-कांबळे लढत!

अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रमेश बागवे आणि भाजपचे सुनील कांबळे यांच्यात थेट लढत होत आहे. विविध धर्म, जात, समुदायाचे मोठ्या संख्येने नागरिक या भागात राहतात. भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांची मलिन झालेली प्रतिमा, मतदारसंघावरील कमी झालेली पकड यामुळे ही निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे. तर, महाविकास आघाडीचे रमेश बागवे यांना या सर्व जमेच्या बाजूंचा मतांमध्ये कसा फायदा करून घेणार, हे निकालच ठरवणार असला, तरी अपक्षांच्या रेलचेलीमुळे अल्पसंख्याक मतविभाजन आणि या मतदारसंघात बहुसंख्येने असलेले मुस्लिम मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

शहरातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात असले, तरी काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे आणि भाजपचे उमेदवार सुनील कांबळे या दोघांतच दुरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिला आहे. मात्र, या मतदारसंघात नेहमीप्रमाणे भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सलग दोन वेळा भाजपने बाजी मारली आहे. यावेळी काँग्रेसकडून पुन्हा रमेश बागवे यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणारा हा मतदारसंघ आहे. यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला विजयाचा विश्वास आहे.

गेल्या पाच वर्षांच्या काळात विद्यमान भाजप आमदार सुनील कांबळे यांची कारकीर्द बादग्रस्त राहिली. ससून रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात कोनशिलेवर आपले नाव नसल्याने कांबळे नाराज झाले. त्यानंतर व्यासपीठावरून खाली येत असताना त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर, पुणे महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. हे प्रकरण चर्चेत आले होते. त्यामुळे मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे यंदा उमेदवारी कापण्यापर्यंत चर्चा रंगल्या होत्या. अखेरीस का होईना, भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्याचा फटका कांबळे यांना बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला या मतदारसंघातून लीड मिळाल्याने काँग्रेसला या मतदारसंघातून मोठी आशा आहे.

Assembly election 2024 – पर्वतीत प्रस्थापितांना धक्का बसणार!

मतदारसंघात झोपडपट्ट्यांसह अनेक प्रमुख पेठा आहेत. यासह कोरेगाव पार्कचा काही भागसुद्धा येतो. विविध धर्म, जात, सुमदायाचे मोठ्या संख्येने नागरिक या भागात राहतात. या मतदारसंघात मध्यमवर्गीय तसेच मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. बहुसंख्येने असलेले मुस्लिम, बहुजन मतदार निर्णायक ठरणार आहेत.

बागवे यांनी दहा वर्षांपूर्वी आमदार म्हणून आणि त्यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून केलेली कामे मतदारांवर बिंबविण्याचा प्रयत्न करत आहेत. बागवे यांचे चिरंजीव नगरसेवक राहिल्याने त्यांचा अनुभवदेखील निवडणुकीत कामाला येत आहे. बागवे यांच्यापाठीमागे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची मोठी ताकद आहे. त्यामुळे यंदा बागवे यांचे पारडे जड मानले जात असले तरी मतांची विभागणी टाळून जास्तीत जास्त मते पदरात कशी पाडणार, हे पाहणे जरूरीचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक भाजपला आव्हानात्मक असणार आहे.

Assembly election 2024 – खडकवासलात नाराजीचा फायदा कोणाला?