गेली 10 वर्षे भाजपचा आमदार असूनही पनवेलमधील मूलभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. महापालिकेतील भ्रष्टाचार, अतिक्रमणांचा विळखा, पाणीटंचाई यांमुळे पनवेलमधील नागरिकांचा भाजप आणि महायुतीविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे पनवेल विधानसभा मतदारसंघात यावेळी बदल नक्की घडणार असेच वातावरण आहे. पनवेलकरांची साथ सोबत महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार लीना गरड यांना मिळत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात ‘मशाल’चे तेज पाहायला मिळत आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या लीना गरड आणि महायुतीचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. बाळाराम पाटील अपक्ष रिंगणात असले तरी त्यांच्या धरसोड भूमिकेमुळे मतदारांचा त्यांच्यावर भरोसा नाही. प्रशांत ठाकूर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पैकी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर तर नंतर दोनदा भाजपच्या तिकिटावर ते जिंकून आले. मात्र ठाकूर भाजपमध्ये गेल्यापासून पनवेलमधील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे.
पनवेल महापालिकेला भाजपचे प्रशांत ठाकूर व त्यांच्या बगलबच्चे नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला. याविरोधात लीना गरड यांनी वेळोवेळी आवाज उठवून पोलखोल केली. आता लीना गरड मशाल चिन्हावर विधानसभेच्या रिंगणात असल्याने विरोधकांनी त्यांचा धसका घेतला आहे. त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सातत्याने आघाडीवर असल्याने हा लोकसंपर्क लीना गरड यांच्या कामी येईल, असे पनवेलमध्ये वातावरण आहे.
वार्तापत्र (बेलापूर) – चौरंगी लढतीत संदीप नाईक यांचे पारडे जड
भाजप बोलतंय एक आणि करतंय दुसरंच
भाजप बोलतंय एक आणि करतंय दुसरंच याचा प्रत्यय आल्याने लीना गरड यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन पनवेल महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात लीना गरड यांनी छेडलेल्या आंदोलनामुळे पहिल्याच दणक्यात 30 टक्के मालमत्ता कर पनवेल महानगरपालिकेला कमी करावा लागला. पनवेलमधील जनतेला भाजपचा खरा चेहरा कळला असल्याने महाविकास आघाडीला विजयाची संधी आहे.
ठाकूर यांनी कुणाचा विकास केला?
आमदार म्हणून प्रशांत ठाकूर अपयशी ठरले आहेत. पाणी, मालमत्ता कर, नैना, खड्ड्यात गेलेले रस्ते, वाहतूककोंडी, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आदी प्रश्नांवरून प्रशांत ठाकूर हे चांगलेच अडचणीत आले आहेत. प्रचाराला गेल्यानंतर नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. आमदार म्हणून तुम्ही कुणाचा विकास केला, असे प्रश्न त्यांना विचारले जात असल्याने यावेळी कमळ कोमेजणार अशीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे.