आमदार अण्णा बनसोडे मतदारसंघातील पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, नागरिकांना भेटत नाहीत, अशा पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी होत असल्याचे सांगत शहराध्यक्षपदाची धुरा स्वीकारताच बहल यांनी बनसोडे यांच्यावर तोफ डागली आहे. त्यामुळे पिंपरी शहर राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली असून, बहल यांनी बनसोडे यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे विरोध केल्याचे बोलले जाऊ लागले आहे. यातूनच बनसोडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीचे सोमवारी अधिकृत पत्र मिळाल्यानंतर बहल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पक्षाचे आमदार बनसोडे यांच्यावर निशाणा साधला. माजी नगरसेविका स्वाती काटे, माया बारणे, फजल शेख, उल्हास शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते. पिंपरीतून कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, यासाठी सर्वांशी चर्चा करण्याची माझ्याकडे जबाबदारी दिल्याचे सांगत बहल म्हणाले, आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, प्रभागातील काम करतात; परंतु स्थानिक नगरसेवकांना विचारत नाहीत, नागरिकांना, पक्षातील पदाधिकाऱ्यांना भेटत नाहीत. अशा विविध तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पिंपरीत नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणी होऊ लागली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशीही उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करत आहेत. मूल्यमापन करून निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिली जाईल.
खासदारांचाही आमदार बनसोडे यांना विरोध
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या मिंधे गटाच्या मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही योग्य व्यक्तीला पिंपरीची उमेदवारी द्यावी, अशी भूमिका आहे. चेहरा बदली करायचा असेल तर जितेंद्र ननावरे यांना उमेदवारी दिल्यास आपण झोकून देऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचेही बहल यांनी सांगितले.
भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक
राष्ट्रवादीकडे आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक काळूराम पवार, जितेंद्र ननावरे, आरपीआय (आठवले गट) च्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, भाजपचेच राजेश पिल्ले, तेजस्विनी कदम यांनीही उमेदवारी मागितली आहे. या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचेही बहल यांनी सांगितले.
2019 ची पुनरावृत्ती होणार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पक्षाकडून शिलवंत यांना अधिकृत एबी फॉर्मही दिला होता. मात्र, त्यांनी अर्ज भरण्यापूर्वीच शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी खेळी खेळली. रात्रीतून अण्णा बनसोडे यांच्या नावाचा पक्षाकडून एबी फॉर्म आणून त्यांचा ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे शिलवंत यांचा पत्ता कट झाला होता. त्याचप्रमाणे यावेळीही 2019 ची पुनरावृत्ती करण्याचा डाव शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात शिजत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.