शेतकऱ्यांच्या समस्यांचे सोयरसुतक नसलेल्या आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा गवगवा करून मते मागणाऱ्या महायुतीला विदर्भातील तरुण कवीने जबरदस्त टोमणे मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. गोविंद पोलाड या शेतकऱ्याच्या मुलाने जाहीर सभेत भाषण करून सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेची पोलखोल केली. ‘आमची म्हैस वांझोटी, तुमचा हाल्या गाभण’ असा टोला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच विरोधकांच्या मागे ईडी लावण्याच्या भाजपच्या षड्यंत्रावर टीका केली.
काटोल मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सलील देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. या सभेत बोलताना गोविंद पोलाडने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गटावर फटकेबाजी केली. खणखणीत आवाजातील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.