>> अमर मोहिते
अंधेरी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक जाधव व महायुतीचे उमेदवार अमित साटम यांच्यात थेट लढत आहे. मात्र या मतदारसंघातील शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ताकद व अल्पसंख्याक मतदारांचा महाविकास आघाडीला असलेला पाठिंबा यामुळे अशोक जाधव यांच्या गळय़ात विजयाची माळ पडेल, असे चित्र येथे आहे.
अशोक जाधव यांचे या मतदारसंघात आधीपासून वर्चस्व होते. मोदी लाटेत 2014 मध्ये भाजपचे अमित साटम यांनी अशोक जाधव यांचा पराभव केला. 2019 मध्ये अमित साटम यांची आमदारकी शाबूत राहिली. आताच्या निवडणुकीत या मतदारसंघासाठी आधी काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर अशोक जाधव यांना पुन्हा काँग्रेसने संधी दिली.
आधीच्या दोन निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेससोबत नव्हती, मात्र आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसच्या सोबत आहे. या मतदारसंघात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चांगली पक्कड आहे. याचा नक्कीच लाभ अशोक जाधव यांना मिळणार आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही येथे महाविकास आघाडीचे पारडे जड आहे. कारण येथून दोन वेळा अमित साटम हे निवडून आले असले तरी येथील भाजपच्या पारंपरिक मतदारांचे संख्याबळ कमीच आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर हे या मतदारसंघातून इच्छुक होते. मुस्लिम संघटनाही त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. काँग्रेसने अशोक जाधव यांना उमेदवारी दिल्याने हैदर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथला यांनी हैदर यांची नाराजी दूर केली. हैदर यांनी अर्ज मागे घेतला. अशोक जाधव यांचा पूर्ण ताकदीने प्रचार करणार असून ते मोठय़ा मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास हैदर यांनी व्यक्त केला आहे.
अमित साटमांबद्दल रोष
भाजपचे उमेदवार अमित साटम यांच्या तुसडय़ा स्वभावामुळे येथील नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे. अमित साटम हे सरळ बोलत नाहीत. त्यांचा जनसंपर्क कमी आहे, असा येथील मतदारांचा सूर आहे. गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. हे सर्व महायुतीच्या अंगलट येणार आहे.
लोकसभेनंतर वातावरण बदलले
या मतदारसंघात मराठी मतदारांबरोबरच जवळपास 70 हजार मुस्लिम आणि 15 हजार ख्रिश्चन मतदार आहेत. चार बंगला, सात बंगला, जुहू असा उच्चभू आणि उच्चशिक्षित मतदार या मतदारसंघात दिसून येतात. गेली दोन टर्म या ठिकाणी अमित साटम निवडून येत असले तरी सध्याची बदलती राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेसच्या विशेषतः महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितच बाजी मारेल असे चित्र मतदारसंघात आहे. लोकसभेत निवडणुकीच्या निकालावरून ते दिसूनही आले आहे. लोकसभेत अमोल कीर्तिकर यांना या ठिकाणी 70 हजार 522 इतकी मते मिळाली होती, तर रवींद्र वायकर यांना 70 हजार 743 मते मिळाली होती. कीर्तिकर आणि वायकर यांच्या मतांमधील फरक तसा कमी असल्याने महाविकास आघाडीनेही या ठिकाणी जोर लावल्यास महायुतीला मोठा धक्का बसू शकतो.