हडपसर, वडगावशेरी, खडकवासलाच्या अफवांना जोर; वडगावशेरी मतदारसंघ जाणार भाजपकडे; पोर्शे प्रकरणामुळे टिंगरेंचा पत्ता कट

सध्या अजित पवार गटाचा आमदार असलेल्या वडगावशेरी मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला असून, भाजपने खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडला. तर, अजित पवार गटाने हडपसर मतदारसंघासाठी चेतन तुपे यांना एबी फॉर्म दिला, अशा चर्चा आणि अफवांचा बाजार सोमवारी पाहायला मिळाला. उलटसुलट चर्चामुळे हडपसर, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघाच्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सहापैकी पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघांमध्ये भाजपने उमेदवारांची घोषणा केली. तर कसबा, पुणे कॅण्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात अद्याप उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यातच वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तीन महिन्यांपूर्वी पोर्शे अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. वडगावशेरी मतदारसंघात सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्यास विरोधी पक्षांकडून त्याचे भांडवल केले जाऊ शकते. त्यामुळे भाजपने वडगावशेरी मतदारसंघावर दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांनी तातडीने अजित पवारांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

दिवसभर अशा चर्चा सुरू असतानाच अचानक चेतन तुपे, सुनील टिंगरे यांच्यासह 16 जणांना अजित पवार गटाने एबी फॉर्म दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, एबी फॉर्म नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयारीला लागा, अशा सूचना दिल्याचे इच्छुकांनी सांगितले. चर्चा आणि अफवांचा बाजार उठला असला तरी प्रत्यक्षात अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच नक्की कोणाचा पत्ता कट झाला हे स्पष्ट होणार आहे.

फडणवीसांच्या भेटीबाबत बागवेंकडून नकार

पुण्यातील काँग्रसचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे हे भाजपच्या वाटेवर असून, बागवे पिता-पुत्रांनी काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा सोमवारी राजकीय वर्तुळात होती. बागवेंना भाजपमध्ये घेऊन कॅण्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आग्रही असल्याचेही बोलले जात होते. मात्र, हा खोडसाळपणा असून माझ्याबाबत जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे माजी मंत्री रमेश बागवे यांनी स्पष्ट केले.