महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पेरेशनने बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मेट्रो सेवेची वेळ वाढविली आहे तसेच 19 अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
मतदानाच्या दिवशी प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो सेवा नेहमीपेक्षा लवकर सुरू होतील आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील. पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता गुंदवली, दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) स्थानकावरून सुटेल. तर शेवटची मेट्रो मध्यरात्री 1 वाजता सुटेल. या वाढीव वेळेत मेट्रो दर 20 मिनिटांनी उपलब्ध असून एकूण दैनंदिन फेऱया 243 वरून 262 पर्यंत वाढतील. मतदार आणि निवडणूक कर्मचाऱयांना सहज आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, हा या विस्तारित सेवांचा उद्देश आहे.