तीनवेळा आमदार झालेल्या आमदाराची कामगिरी बघून उमेदवारी देण्याच्या अथवा न देण्याच्या धोरणामुळे तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हरयाणा पॅटर्न वापरण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येत असल्याने पुण्यातील विद्यमान दोन आमदारांची धाकधूक वाढली आहे. याच निकषावर खडकवासला आणि पर्वती मतदारसंघांमध्ये भाजपमधील नव्या इच्छुकांनी जोर पकडला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला सत्ताधारी म्हणून अॅन्टी इन्कमबन्सीची भीती वाटते. निवडणूक जिंकण्याची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या आमदारांच्या उमेदवारीचे आणि प्रचाराची दिशा ठरविण्याचे काम पक्षाची यंत्रणा करीत आहे. या संदर्भात ‘हरयाणा पॅटर्न’ नुसार बुथनिहाय नियोजन केले जाणार आहे. तीनवेळा आमदार होऊन पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज असलेले खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर आणि पर्वतीमधील आमदार माधुरी मिसाळ यांच्या कामगिरीचे मूल्यमापन भाजपमध्ये सध्या सुरू आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन मंत्र्यांसह विविध आमदारांना तिकिटे नाकारली होती. ज्यांचा परफॉर्मन्स समाधानकारक नव्हता, त्यांना उमेदवारी न देण्याचे धोरण राबविले. पक्षाची पहिली यादी जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी भाजपाकडून विद्यमान 25 ते 30 आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याच्या चर्चेमुळे पुण्यातील विद्यमान आमदारांची चर्चादेखील सुरू आहे. ज्या आमदारांबद्दल नाराजी जास्त आहे, त्यांना डच्चू मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. चिंचवडमधील आमदार अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीबद्दलदेखील चर्चा असून, त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इच्छुकांना महामंडळांचे लॉलीपॉप
पर्वतीमधील इच्छूक श्रीनाथ भिमाले राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद, तर दिलीप कांबळे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. राजेश पांडे यांना वखार महामंडळाचे अध्यक्ष, तर वासुदेव काळे यांना राज्य शिक्षण आणि संशोधन मंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर 27 जणांना महामंडळांवर पदांचे लॉलीपॉप दिले आहे.
कसबा मतदारसंघ ब्राह्मण समाजाला द्या
कसबा विधानसभा मतदारसंघासह राज्यातील ब्राह्मणबहुल असलेल्या किमान 30 विधानसभा मतदारसंघांत ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी सकल ब्राह्मण समाज संघटनेसह विविध ब्राह्मण संस्था, संघटनांनी केली आहे. त्यामुळे भाजपची आता अडचण वाढणार आहे. सरकारने नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर केले आहे. जातिनिहाय आरक्षणांमुळे जाती-पातींची अस्मिता अधिकच गडद होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत हिंदुत्वाचा आवाज काहीसा क्षीण होऊ लागला आहे. राज्यात किमान 30 विधानसभा मतदारसंघांत ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाचे समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.