माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांना परतूर मतदारसंघातून सलग आठव्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बबनरावांशिवाय पक्षाला दुसरा कोणी सामान्य कार्यकर्ता उमेदवारीसाठी दिसला नाही का, असा संतप्त सवालही भाजपमधूनच करण्यात येत आहे.
परतूर विधानसभा मतदारसंघासाठी सलग आठव्यांदा भाजपकडून बबनराव लोणीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्याच यादीत त्यांचे नाव झळकले. 1990 पासून परतूरमध्ये फक्त बबनरावच भाजपचा चेहरा राहिले आहेत. त्यापूर्वी जनसंघाकडून सुधाकर पुरी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर प्रथमच भाजपने बबनरावांना 1990 मध्ये संधी दिली. परंतु काँग्रेसचे वैजनाथराव आकात यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1995 मध्ये काँग्रेसच्याच अब्दुल कदीर देशमुख यांनीही बबनरावांना धूळ चारली. 1999, 2004, 2014 आणि 2019 या चार निवडणुका मात्र बबनरावांनी मोठ्या फरकाने जिंकल्या.
बबनरावांच्या विजयात जातीय समीकरणांचा सिंहाचा वाटा होता. हिंदू-मुस्लिम अशा जातीय संघर्षांवरच बबनरावांची राजकीय पोळी पिकली. डॉ. प्रभाकरराव खेकाळे, विजय जयपूरकर, प्रकाश दीक्षित, राम बागल आदी संघ कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचाही त्यांच्या विजयात मोलाचा वाटा होता. निवडून येईपर्यंत संघाच्या चरणी बसायचे आणि निवडून आले की आवडत्या गुत्तेदारांमध्ये रमायचे हा बबनरावांचा एककलमी कार्यक्रम. बबनरावांना चार वेळा संधी मिळूनही परतूर तालुका हा विकासाच्या बाबतीत दुर्दैवीच राहिला. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ते स्वच्छता आणि पाणीपुरवठामंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाचा तालुक्याला कवडीचाही उपयोग झाला नाही.
नव्वदच्या दशकात भाजप राज्यात बहरला. परंतु परतूर मतदारसंघात मात्र भाजपचे खुरटे शुड्पच बघायला मिळाले. बबनराव लोणीकरांना चार वेळा संधी मिळाली, त्यांची भरभराट झाली, पण त्यांच्या नेतृत्वात भाजपला तालुक्यात काही चांगले दिवस आले नाहीत. बबनरावांपाठोपाठ आता त्यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे तालुका भाजप चालवतात. जुने भाजपचे कार्यकर्ते आता औषधालाही सापडत नाहीत. भाजपची साथ त्यांनी केव्हाच सोडली आहे. आत्ता बबनरावांच्या भोवती गुत्तेदार, कंत्राटदार पिंगा घालत असतात. सलग आठव्यांदा उमेदवारी मिळाल्याने बबनरावांच्या गटात आनंदाचे वातावरण असले तरी जुन्याजाणत्या भाजप कार्यकत्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अलिकडच्या काळात बबनरावांपासून फटकून आहे.
- ‘चतुर्वेदेश्वर’ साखर कारखान्याच्या नावाखाली कोट्यवधींचे भागभांडवल गोळा करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप बबनराव लोणीकरांवर आहे. कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेली जमीन बबनरावांनी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणी उच्च प्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
- गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात तक्रार दाखल करून नंतर मांडवली करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
- मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी फडणवीसांच्या काळात 11 हजार कोटी रुपये मंजूर झाले होते. त्या कामातही मोठा घोळ झाल्याचा आरोप बबनरावांबर आहे.
- लाखो रुपयांचे बीज बिल थकवून महावितरणच्या अभियंत्यालाच दमदाटी केल्याचा आरोपही बबनराव | लोणीकर यांच्यावर झाला होता.