निवडणुकीमध्ये नामसाधर्म्य आणि पक्षचिन्ह वाटप करताना एकसारखे दिसणारे चिन्ह हे मतदारांची दिशाभूल करतात. यामुळे अनेकजण आपल्या विरोधातील उमेदवारांच्या नावाचा शोध घेऊन त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल करतात. तसाच प्रकार सांगली जिह्यात झाला आहे. आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, रोहित पाटील, निशिकांत पाटील व जयश्री पाटील यांच्या नावाचे डमी उमेदवार उभे करून मतविभागणीचा प्रयोग केला गेला आहे. त्यामुळे दिग्गजांची डोकेदुखी वाढली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांच्या नावाने असणाऱया दुसऱया उमेदवाराला निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरविण्याचे प्रयत्न झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह आहे. या चिन्हाला साधर्म्य असलेले दुसरे चिन्ह म्हणजे पिपाणी. हे अपक्ष उमेदवाराला देऊन मते बाद करण्याचा अनेक मतदारसंघांत प्रयोग झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाच्या दोन उमेदवारांचा पराभव झाल्याचेदेखील सिद्ध झाले आहे. तोच पॅटर्न आता विधानसभेच्या निवडणुकीत वापरला जात आहे.
दिग्गजांच्या मतदारसंघात नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या नावाचे साधर्म्य असलेले जयंत पाटील नावाच्या दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. चिन्हवाटपावेळी आमदार जयंत पाटील यांना तुतारी चिन्ह असणार आहे. पण त्यांच्या नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराने जर पिपाणी चिन्ह मिळवले तर त्यांची डोकेदुखी बनणार आहे.
दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळ चिन्हावर उभे आहेत. निशिकांत पाटील नावाचे आणखी दोन उमेदवार या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रोहित पाटील उभे आहेत. त्याच मतदारसंघात रोहित पाटील नावाचे तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी एका उमेदवाराचे नाव रोहित रावसाहेब पाटील आहे. त्यामुळे या नावाचे दोन उमेदवार असणार आहेत. दोन्ही नावे एकच वाटतात. अपक्ष तिन्हीपैकी एका उमेदवाराला पिपाणी चिन्ह मिळाले तरीदेखील त्यांची अडचण निर्माण होणार आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघातदेखील हीच परिस्थिती आहे. आमदार मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नावात साधर्म्य असलेल्या एका उमेदवाराचा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांना काँग्रेसकडून सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळालेली नाही. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. पण त्यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या जयश्री पाटील नावाच्या आणखी दोन महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विरोधकांनी नामसाधर्म्य असणारे उमेदवार उभे केल्याने दिग्गज उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.