Rashmi Shukla – पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; महाविकास आघाडीच्या मागणीला यश

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने हटवले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवले आहे. विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. ‘एएनआय’ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

काँग्रेससह महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी लावून धरली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. शुक्ला यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्यात यावी. तसेच महाराष्ट्राच्या महासंचालकपदी नवी नियुक्ती करण्यासाठी मंगळवार दुपार एक वाजेपर्यंत 3 आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनल पाठवण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. मात्र मिंधे सरकार सत्तेत येताच त्यांना क्लीन चिट देऊन त्यांची राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये पूर्ण झाला होता. मात्र मिंधे सरकारने नियमबाह्य पद्धतीने त्यांना जानेवारी 2026 पर्यंत बढती दिली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.

रश्मी शुक्ला यांची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिलेली असून नियमबाह्य कामे, तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला होता. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या संदर्भात बैठकही घेतली आणि शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसने पत्रात काय म्हटले होते?

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सोडले आहे. पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत, धमक्या देत आहेत. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती याआधीही वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना पोलीस महासंचालकपदावर नियुक्त करण्यात आले आणि निवृत्तीनंतरही त्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यकाल वाढवून दिला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून तत्काळ हटवावे, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्रात केली आहे.