अजितदादा दिल्लीत, शिंदे ठाण्यात; गृहखात्याचा आग्रह दबावासाठी, खरंतर नगरविकास, बांधकाम आणि महसूलवर डोळा, महायुतीची बैठक पुन्हा रद्द

गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे राहील अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतल्यानंतर अजित पवार गटाशी तुल्यबळ अशी खाती मिळवण्यासाठीच मिंध्यांची आडेबाजी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने मिंधे गटाला नगरविकास खाते देऊ केले. गृह खात्याच्या बदल्यात त्याबरोबर सार्वजनिक बांधकाम खातेही देण्याची तयारी दर्शवली. पण मिंधे गटाची हाव इतकी वाढलीय की त्यांनी महसूल खात्यासाठीही हट्ट धरला आहे. यावरूनच अद्याप महायुतीमध्ये मंत्रीपद वाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नसून आपली ताकद दाखवण्यासाठीच मिंधे गटाने बहिष्कार घातल्याने आजची महायुतीची बैठक रद्द करावी लागल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

132 जागा जिंकणाऱया भाजपकडेच मुख्यमंत्री पद जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी त्या पदावरचा आपला हट्ट सोडला. पण मुख्यमंत्री पदाशी तुल्यबळ असे गृहखाते मागितले. अजित पवार गटाचे अर्थखाते कायम राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे दुसऱया क्रमांकाचे गृह खाते आपल्याला मिळावे यासाठी मिंधे गटाचे आकांडतांडव सुरू असल्याचे बोलले जाते.

महायुतीमध्ये भाजपला 20, मिंधे गटाला 13 आणि अजित पवार गटाला 10 मंत्रिपदे दिली जाणार असल्याची माहिती आहे. पूर्वी होती तीच खाती कायम राहावीत, अशी अजित पवार गटाची मागणी आहे. मिंधे गट अतिरिक्त खात्यांवर आग्रही आहे. भाजपने त्यांना एक खाते वाढवून दिले तरीही ते अडून बसले आहेत.

मिंधे गटाचे लाड का?

मिंधे गटाने पाठिंबा दिला नाही तरी भाजपा आणि अजित पवार गटाचे सरकार बनवण्याइतके बहुमत होते. मिंधे गटाला भाजपने केव्हाच नकार दिला असता, पण पेंद्रात मिंधे गटाचे आठ खासदार मोदी सरकारबरोबर असल्याने त्यांचे घोडे अडले आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर मोदी सरकार असले तरी मिंध्यांचे आठ खासदारही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आठ खासदार असूनही मिंधे गटाने केंद्रात कोणतेही मंत्रिपद घेतलेले नाही. त्याच जोरावर राज्यात त्यांची बार्गेनिंग सुरू असल्याची चर्चा आहे.

केसरकरांचे शिक्षण खाते भाजपला हवे

मिंधे गटाचे दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री होते. परंतु आता शिक्षण खाते भाजपला हवे आहे. केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठी शिक्षण खाते आपल्याकडेच यावे यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. केसरकर यांच्या वादग्रस्त विधानांच्या आधारे त्यांची दांडी गुल करण्याचाही भाजपचा कावा सुरू असल्याची चर्चा आहे. ठाण्याच्या हेलिपॅडवर शिंदे आणि केसरकर यांच्यात झालेल्या गुफ्तगूमध्ये हाच विषय होता असे सांगितले जाते.