राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली, धरणातील पाणीसाठा फक्त 20 टक्क्यांवर

मान्सून राज्याच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला असला तरी राज्यातल्या सुमारे तीन हजार लहानमोठय़ा धरणांमधील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अतिशय भीषण झाली आहे. या सर्व धरणांमधील पाणीसाठा केवळ 20 टक्क्यांवर आला आहे. राज्यातील अकरा हजारांहून अधिक गावे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. पुढील काही दिवसांत मान्सून पूर्ण ताकदीने सक्रीय झाला नाही तर राज्यात दुष्काळ अटळ असल्याची चिंता सरकारी यंत्रणांना सतावत आहे.

संपूर्ण राज्यात मिळून 2 हजार 997 लहानमोठी धरणे आहेत. या धरणांमधील पाणीसाठा सध्याच्या घडीला 20. 32 टक्क्यांवर आला आहे. धरणातील पाण्याच्या भीषण परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंडवडमधील एका व्यक्तीने थेट मंत्रालय गाठून मंत्रालयाच्या त्रिमूर्ती चौकातील जाळीवर उडी मारली होती. मुंबई, कोकण व नाशिक वगळता इतर भागांतील निवडणूक आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पाणी साठय़ाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्वाधिक भीषण परिस्थिती संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगरमधल्या धरणातील पाणीसाठा फक्त 8.18 टक्क्यांवर आला आहे. संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजे 2 हजारांहून अधिक टँकर धावत आहेत.

भूजल सर्वेक्षण 

केंद्र व राज्याच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणांच्यावतीने राज्यातील भूजल साठय़ांचे मोजमाप केले जाते. या भूजल अहवालानुसार महाराष्ट्राच्या भूगर्भातील एकूण 32 अब्ज घनमीटर भूजलापैकी सुमारे 16 अब्ज धनमीटर इतक्या भूजलसाठय़ाचा वापर केला जातो. तर 2 अब्ज घनमीटर पाण्याचे वाष्पीभवन होते तर 14 अब्ज घनमीटर भूजल वापरले जाते. राज्यातील 82 टक्के शेती कोरडवाहू असून पाण्याची मागणी वाढतच आहे. परिणामी जलसाठे कमी पडत असून राज्यापुढे गंभीर जलसंकट निर्माण होत असल्याची भीती जलसंपदा विभागातील अधिकारी व्यक्त करतात.

 

24 जिल्ह्यांत पाण्याचे दुर्भिक्ष 

राज्यातल्या 24 जिल्ह्यां मध्ये 11 हजार 701 गावांमधील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी तब्बल 11 हजार 701 टँकर धावत आहेत. संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजे 2 हजार 12 टँकर धावत आहेत.

– गेल्या वर्षी या काळात फक्त 350 टँकर राज्यात धावत होते. यावरून यंदाच्या दुष्काळाची दाहकता लक्षात येते असे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात.

विभाग – धरणातील

पाणीसाठा

नागपूर – 37.33 टक्के

अमरावती – 37.20 टक्के

छत्रपती संभाजीनगर – 8.18 टक्के

नाशिक – 23 टक्के

पुणे – 13.12 टक्के

कोकण – 30.93 टक्के

एकूण टँकरची संख्या – 4 हजार 11

गावे – 3 हजार 304

वस्त्या – 8 हजार 397

जिल्हा – टँकरची संख्या

ठाणे – 48

रायगड – 57

रत्नागिरी – 25

पालघर – 52

नाशिक – 398

जळगाव – 113

पुणे – 294

सातारा – 217

सांगली – 109

सोलापूर – 211