महाराष्ट्र सायबर पोलिसांची विक्रमी वेळेत कारवाई, 25 मिनिटांत एक लाख जाण्यापासून वाचवले

महापे येथील एका हॉटेलात जेवणाची ऑर्डर देणाऱ्या एका महिलेला सायबर भामट्यांनी बरोबर हेरले आणि महिलेच्या क्रेडिट कार्डवरून एक लाखाचे दोन ट्रान्झॅक्शन केले. पण महिलेने वेळीच महाराष्ट्र सायबर पोलिसांशी संपर्क साधल्याने अवघ्या 25 मिनिटांत पोलिसांनी ते एक लाख सायबर भामट्यांच्या खिशात जाण्यापासून रोखले.

आकांक्षा (नाव बदललेले) या 41 वर्षीय महिला गुगलवर एक रेस्टॉरन्ट शोधत होत्या. तेव्हा त्यांना महापे येथील एका हॉटेलचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यावर संपर्क साधून त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. दरम्यान, त्यांनी कॉलद्वारे जेवणाचे पैसे व्रेडिट कार्डद्वारे देण्याबाबत सांगितले. शिवाय समोरच्या कॉलरवर विश्वास ठेवून आकांक्षा यांनी त्याला आपल्या व्रेडिट कार्डची डिटेल देऊ केली. त्यानंतर लगेच एक लाख रुपयांचे दोन बेकायदेशीर ट्रान्झॅक्शन झाले. यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच आकांक्षा यांनी लगेच महाराष्ट्र सायबर पोलिसांना 14407 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ दखल घेत आकांक्षा याचे एक लाख रुपये गोठवले. अवघ्या 25 मिनिटांत पोलिसांनी एक लाख रुपये सायबर भामटय़ांच्या खिशात जाण्यापासून रोखले. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी विक्रमी वेळेत महिलेचे एक लाख रुपये जाण्यापासून रोखत सायबर भामटय़ांना चांगलाच दणका दिला.