
कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा कायमच विरोध होता आणि यापुढेही राहील. सर्वोच्च न्यायालयाने अलमट्टीची उंची वाढवण्याला स्थगिती दिली आहे, मात्र तरीही कर्नाटक सरकार धरणाची उंची वाढवत असेल तर राज्य सरकार हस्तक्षेप याचिका दाखल करेल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्यांनी विखे पाटील यांनी उत्तर दिले. या धरणाची उंची वाढवण्यासाठी संबंधित लवादाने कर्नाटक सरकारला परवानगी दिलेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अंतिम निर्णय देताना महाराष्ट्र सरकारचे मत विचारात घ्यावे यासाठी राज्य सरकार हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे, असे त्यांनी सांगितले.