Maharashtra Budget Session 2025 – पालिका रुग्णालयात एनआयसीयू उभारा, विधानसभेत शिवसेनेची मागणी

मुंबई शहर व उपनगरातील मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी एनआयसीयूची (नवजात अर्भकांसाठी अतिदक्षता विभाग) सुविधा नाही. त्यामुळे उपचारांसाठी नवजात अर्भकाला परळ येथील वाडिया रुग्णालयात नेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे माता उपनगरातील एका रुग्णालयात आणि नवजात बालक परळच्या वाडिया रुग्णालयात अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मुंबई व उपनगरातील रुग्णालयात एनआयसीयू तातडीने उभारण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली.

माहितीच्या मुद्द्याद्वारे सुनील प्रभू यांनी सभागृहाचे या विषयाकडे लक्ष वेधले. मुंबई महापालिकेच्या खास करून पश्चिम उपनगरातील रुग्णालयात नवजात अर्भकाला परळच्या वाडिया रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये दाखल करावे लागते. पण वाडिया रुग्णालयात एनआयसीयूसाठी प्रतीक्षा यादी असल्याने हतबल पालकांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्याने नवजात अर्भके दगावतात. खासगी रुग्णालयात एनआयसीयूचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेची वैद्यकीय रुग्णालये व सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये एनआयसीयू उभारून मुंबईतील आरोग्य व्यवस्था सक्षम व बळकट करावी, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.