Maharashtra Budget Session 2025 – मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण, राज्य सरकारची नवी डेडलाइन

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला विलंब झाला आहे. पण आता विविध टप्प्यांवरील कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. जानेवारी 2026 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले असेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज विधानसभेत व्यक्त केला. ही कामे पूर्ण करताना कामाच्या दर्जाशी कोणतीही तडतोड करणार नाही आणि खेड-चिपळूण गावाच्या सीमेवरून कापसाळ गावपर्यंत उड्डाणपूल बांधण्याच्या संदर्भात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीला सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

चिपळूण शहरातील बहादूर शेख चौकात उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना गर्डर व लाँचरसह उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याच्या दुर्घटनेच्या संदर्भात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावरील चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव पुढे म्हणाले की, नशीब बलवत्तर म्हणून स्थानिक आमदार शेखर निकम या दुर्घटनेतून बचावले. या घटनेला सात महिने उलटले तरी अद्याप नव्याने काम सुरू झालेले नाही. या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमली होती, पण या समितीचा अहवाल गुलदस्त्यात राहिला. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. महामार्गाच्या कामास झालेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण असल्याचे सांगितले.

अपघाताचे प्रमाण वाढले

या महामार्गाचे काम रखडल्याने अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातात एका कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला, मात्र त्यात मुंबई-गोवा महामार्गाचा साधा उल्लेख केला नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन फिल्ड रस्त्याची घोषणा केली, मात्र ती हवेतच विरली. हा महामार्ग पूर्ण होण्याबाबत सरकारकडून प्रत्येक वेळी तारखा दिल्या. आता 2025 वर्ष उजाडले, पण तरीही महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

सर्व्हिस रोड सुस्थितीत

परशुराम घाटाच्या संरक्षक भिंती तेथील ठिसूळ माती असल्यामुळे कोसळते. मात्र आता त्याचे डिझाईन बदलले आहे. कोकणातल्या गणपती आणि शिमगा सण लक्षात घेता सर्व्हिस रोड सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिपळूण उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला 50 लाख रुपयांचा आणि डिझाईन तयार करणाऱ्या इंजिनीअरला 20 लाख रुपयांचा दंड दंड ठोठावल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.