
मुंबईत गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून तो प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यासंदर्भातील तक्रारींकडे महानगरपालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे आणि आता अर्थसंकल्पात महायुती सरकारनेही त्यावर उपाययोजनांसाठी तरतूद केलेली नाही याकडे लक्ष वेधतानाच, मुंबईतील पाणी समस्या दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आमदार नर यांनी मुंबईतील पाणी समस्येबरोबर अनेक मुद्दे मांडले. महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ऐशारामात जीवन जगणाऱयांसाठी अधिक सुविधा आणि गोरगरीबांसाठी फक्त वाटाण्याच्या अक्षता असा असल्याची टीका नर यांनी केली.
मुंबईच्या पाणी प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मुंबईला रोज 4 हजार दशलक्ष लिटर पाणी मिळते, खरंतर मुंबईला 4400 ते 4600 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. परंतु अर्थसंकल्पात त्यासाठी काहीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. स्वातंत्र्यानंतर फक्त मध्य वैतरणा हा एकच तलाव मुंबईत बनवला गेला. गार्गाई जलाशयाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. गतिमान सरकारने वन विभागाची परवानगी दिली तर त्या जलाशयाचे काम पूर्ण होईल, असे आमदार नर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
मुंबईतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांची यादी गेली 20 वर्षे बनवण्यात आलेली नाही, ती बनवण्यात यावी. मुंबईतील शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमधील सुविधांचे सक्षमीकरण करावे. आरेतील आदिवासी पाड्यांना सर्व सुविधा पुरवून त्यांचा विकास करावा. अंधेरी, जोगेश्वरीतील दुरावस्था झालेल्या पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करावा. जोगेश्वरी गुंफेचे संवर्धन व जतन करावे, अशा मागण्याही नर यांनी केल्या.
…तरच वाहतूक गतिमान होईल
मुंबई उपनगरांतील वाहतूक गतिमान करण्यासाठी रस्ते, पूल, भुयारी मार्ग बांधणार असल्याचे सरकारने सांगितले. पण तो पर्याय पुरेसा नाही. मुंबईतील अनेक रस्त्यांवर दुतर्फा पार्किंग केले जाते. तसेच भंगार गाड्या वर्षानुवर्षे पडून आहेत. त्या उचलण्यासाठी वाहतूक विभागाकडे यंत्रणा नाही आणि उचलल्या तर ठेवायला जागा नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे या समस्या दूर केल्या तर वाहतूक गतिमान होऊ शकणार आहे, असे आमदार नर म्हणाले.
बेस्ट प्रशासनालाही निधी द्या
सार्वजनिक परिवहन विभाग तोट्यात असूनही फक्त 3610 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक परिवहन सेवेत मुंबईतील बससेवाही येते. ती सक्षम करणे गरजेचे असून बेस्ट प्रशासनालाही नवीन बसेससाठी तरतूद करण्यात यावी, अशी विनंती नर यांनी केली.
निराधार योजनेतील जाचक अटी रद्द करा
लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये द्या, पण विधवा व निराधार महिलांसाठी असलेल्या निराधार योजनेतील जाचक अटीही दूर करा, असेही नर यांनी सांगितले. त्या योजनेतील 21 हजार रुपये उत्पन्नाची अट काढून ती 60 हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.